प्रतापगड (Pratapgad)

‘‘महाबळेश्वरच्या जटांत व पारघाटाच्या ओठात’’ शिवाजी महाराजांनी बुलंद किल्ला बांधला तो म्हणजे ‘‘प्रतापगड‘‘. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा वध ह्याच किल्ल्याच्या पायथ्याशी केला. ह्या सुप्रसिध्द घटनेमुळे व महाबळेश्वरच्या सानिध्यामुळे सर्वांना माहीती असलेला हा किल्ला आजही सुस्थित उभा आहे.

इतिहास :
१६५६ मध्ये चंद्रराव मोर्‍यांचा पराभव करुन शिवाजी महाराजांनी ‘जावळी‘ ताब्यात घेतली. जावळीच्या खोर्‍यात पारघाटाच्या तोंडावर व रडतोंडी घाटाच्या नाकावर ‘‘भोरप्या डोंगर‘‘ एखाद्या रखवालदारासारखा उभा होता. ह्या भोरप्या डोंगरावर किल्ला बांधायची आज्ञा महाराजांनी मोरोपंतांना दिली. मोरोपंतांनी दूर्गबांधणीचे कौशल्य पणाला लावून १६५८ साली बुलंद व अभ्येद्य किल्ला तयार केला; तोच हा प्रतापगड. प्रतापगडचे पहिले किल्लेदार म्हणून महाराजांनी अर्जोजी यादव ह्यांची नेमणूक केली.

इ.स १६५९ साली अफजलखान प्रचंड सैन्यानिशी स्वराज्यावर चालून आला. महाराजांनी युक्तीने त्याला प्रतापगडाखाली जावळीच्या खोर्‍यात आणले. दिनांक ९ नोव्हेंबर १६५९ रोजी दूपारी २ वाजता शिवरायांनी अफजलखानाचा वध केला आणि त्याच्या प्रचंड सैन्याचा गनिमी काव्याने धुव्वा उडवून स्वराज्यावर आलेले हे संकट उधळून लावले. इ.स १६६१ मध्ये महाराजांनी गडावर महिषासूरमर्दिनी भवानी देवीची स्थापना केली.
इ.स १६५९ ते १८१८ ह्या प्रदिर्घ कालखंडात १६८९ सालातील काही काळ वगळता हा किल्ला शत्रुला जिंकता आला नाही.

शिवरायांच्या शेकडो किल्ल्यांपैकी रायगड, प्रतापगड, पन्हाळा, सिंहगड, पुरंदर, सिंधुदुर्ग, तोरणा, राजगड ह्या किल्ल्यांना जणू अनेक देवस्थानापैकी बारा ज्योतिर्लिंगाप्रमाणे महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रतापगड ह्यामध्ये अग्रस्थानी आहे.

प्रतापगडा कडे जाणारा मार्ग.

जावळी चे जंगल .

वाटेत लागणारा धबधबा.

प्रतापगड

टेहाळणी बुरुज

पश्चिमाभिमूख महाद्वार

टेहाळणी बुरुज ह्या बुरुजाखालून असलेल्या वाटेने गडावर जाताना उजव्या बाजूच्या तटबंदीत विविध पातळीवर जंग्यांची रचना केलेली दिसते. ह्या रचनेमुळे प्रवेशद्वाराकडे येणारा शत्रु, बंदुकीच्या व बाणांच्या टप्प्यात रहात असे. ह्याच मार्गाने काही पायर्‍या चढून गेल्यावर आपण तटबंदीत लपवलेल्या पश्चिमाभिमूख महाद्वारापाशी येतो. ह्या महाद्वाराची रचना अशाप्रकारे करण्यात आली आहे की, तोफांचा मारा थेट दरवाजावर करता येऊ नये. जमिनीपासून उंचावर असलेल्या महाद्वारामुळे हत्तीं किंवा ओंडक्यांनी धडका देवून दरवाजा तोडता येत नसे.

पश्चिमाभिमूख महाद्वार

प्रचंड तोफ

महाद्वाराच्या आतील बाजूस पहारेकर्‍यांसाठी देवड्या आहेत. ह्यातील उजव्या हाताच्या देवडीत एक प्रचंड तोफ आहे.

नैऋत्य तलाव

मंदिरामागील पायवाटेने आपण गडाच्या टोकावर असलेल्या स्नानाचे तळे(नैऋत्य तलाव) व तटबंदीत असलेला चोर दरवाजा पाहू शकतो.

तोफा

श्रीभवानी मंदिराच्या आवारात ५ ते ६ छोट्या तोफा पाहायला मिळतात.मंदिरातील महिषासूरमर्दिनीच्या रुपातील भवानी मातेची मूर्ती नेपाळमधील गंडकी नदीच्या काठावरुन आणलेल्या खास शिळेमधून घडवलेली आहे. मंदिरात स्फटीकाचे शिवलिंग आहे. मंदिरासमोर दगडी दिपमाळा आहेत.

श्रीभवानी मंदिराकडून बालेकिल्ल्याच्या पायर्‍या चढतांना उजव्या हातास श्रीसमर्थांनी स्थापन केलेला हनुमान आहे.
पुडे बालेकिल्ल्यावर शिवरायांचा अश्वारुढ पुतळा व छोटी बाग आहे.

छत्रपती शिवाजी महाराज

गडाच्या दक्षिण व उत्तर टोकाला अनुक्रमे दुपदरी बांधणीचा यशवंत बुरुज व रेडका बुरुज आहे. ह्या दोन बुरुजांमध्ये नासके तळे व गोडे तळे आहे.

यशवंत बुरुज

रेडका बुरुज

टेहाळणी बुरुजा

ह्या खेरीज गडावर वेताळाचे मंदिर, स्वयंभू केदारेश्वराचे मंदिर, घोरपडीचे चित्र असलेली राजपहार्‍यांची दिंडी, कडेलोट, सूर्यबुरुज इत्यादी ठिकाणे आहेत.

पोहोचण्याच्या वाटा :
महाराष्ट्रातील प्रसिध्द थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर येथून खाजगी वहानाने किंवा बसने ४० मिनीटात प्रतापगडाच्या पायथ्याशी जाता येते. याखेरीज मुंबई – गोवा महामार्गावरील पोलादपूरहून आंबेनळी घाटाने प्रतापगडावर जाता येते.
राहाण्याची सोय :
गडावरील विश्रामगृहात रहाण्याची सोय होऊ शकते.

जेवणाची सोय :
गडावर जेवणासाठी अनेक उपहारगृह आहेत.

धन्यवाद